धक्कादायक: जिल्ह्यात वर्षभरात तब्बल १२९ शेतकर्‍यांनी संपविले जीवन

Foto

औरंगाबाद- जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्याचा प्रत्यय शेतकरी आत्महत्यांच्या घटनेवरून येऊ लागला आहे. गेल्या अकरा महिन्यांमध्ये तब्बल १२९ शेतकर्‍यांनी दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवन संपवले. नोव्हेंबर महिना सर्वाधिक सर्वात काळा महिना ठरला आहे. या महिन्यात शेतकर्‍यांनी तब्बल १९ आत्महत्या केल्या.

 

गेल्या काही वर्षांपासून मराठवाडा विभागात पावसाचे प्रमाण घटत चालले आहे. अत्यल्प पाऊस व घटत चाललेले शेती उत्पादन यामुळे शेतकर्‍यांसमोरील संकटात भर पडत चालली आहे. पुरेशा पावसाअभावी पाणीटंचाई भेडसावत आहे. मराठवाडा ङ्गदुष्काळवाडाफ झाला आहे. त्यातल्या त्यात औरंगाबाद आणि जालना हे दोन्ही जिल्हे सतत दुष्काळाच्या फेर्‍यात अडकत आहेत. यावर्षी तर भीषण परिस्थिती दिसते. 

 

खरीपानंतर जणू आभाळच कोसळले

 

पेरणी आणि खत बियाणांसाठी उचललेल्या कर्जाचा बोजा शेतकर्‍यांच्या डोक्यावर पुन्हा एकदा वाढू लागला आहे. गतवर्षीच्या कर्जमाफीने हायसे वाटण्याच्या आधीच यावर्षी पुन्हा निसर्गाने घात केला.  बँकांसह खाजगी सावकारांच्या कर्जाच्या जाळ्यात शेतकरी अडकला आहे. कर्जमाफीनंतरही शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत. यावर्षी जानेवारी महिन्यात तर फेब्रुवारी महिन्यात १६ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या होत्या. कर्जमाफीचा लाभ पदरात पडल्यानंतर झालेल्या आत्महत्या गंभीर प्रश्‍न निर्माण करून गेल्या. त्यानंतरही आत्महत्येचे सत्र थांबलेले नाही. मार्च महिन्यात १५, एप्रिल १२ तर मे महिन्यात १४ शेतकर्‍यांनी जीवन संपविले. त्यामुळे कर्जमाफीने काहीही साध्य झाले नाही, असेच दिसते.  यावर्षी नोव्हेंबर महिन्यात आत्महत्येचा आकडा १९ वर पोहोचला आहे.

 

गेल्या काही वर्षांत एकाच महिन्यात झालेल्या या सर्वाधिक आत्महत्या आहेत. जून महिन्यानंतर शेतकर्‍यांच्या जीवनात आलेले नैसर्गिक संकट अधिकच गडद झाल्याने सप्टेंबरपासूनच आत्महत्यांचा दर वाढू लागला. सप्टेंबर महिन्यात १४ शेतकर्‍यांनी आयुष्य संपवले. ऑक्टोबर महिन्यात हा आकडा वर आला, तर नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एकदा आत्महत्यांच्या घटना वाढल्या. नोव्हेंबरमध्ये तब्बल १९ शेतकर्‍यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आयुष्य संपवले.

 

जिल्ह्याला सन २००५ पासून शेतकरी आत्महत्येचा कलंक लागला आहे. २०१२ पासून आत्महत्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. २०१५ या वर्षात मराठवाड्यात सर्वाधिक अकराशेहून शेतकर्‍यांनी आत्महत्या करून आपले आयुष्य संपवले होते. २०१६-१७ मध्ये हा आकडा काहीसा कमी झाला तरी यावर्षी मात्र पुन्हा एकदा आत्महत्यांचा आकडा वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १२९ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. 

 

पात्रतेला निकषांची कात्री

 

शेतकरी आत्महत्यांचे निकष सैल करण्याऐवजी प्रशासन अत्यंत बारकाईने या आत्महत्यांचा तपास करीत असल्याचे दिसते. पोलिस प्रशासन, महसूल, बँका, आरोग्य विभाग यासह विविध विभागांचा समावेश या तपासणी पथकात करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. शेतकरी आत्महत्यांच्या प्रलंबित प्रकरणांची संख्या पाहता हे विभाग गंभीर नसल्याचे दिसते. आतापर्यंत २९ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहेत, तर १९ प्रकरणे अजूनही चौकशीसाठी प्रलंबित आहेत. ८१ पात्र प्रकरणांत ८१ लाख रुपयांची मदत या कुटुंबांना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.